अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारचा भीषण अपघात ; ७ ठार

मथुरा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यामध्ये अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारच्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास बलदेव परिसरात झाला. जखमीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त अ‍ॅम्ब्युलन्स जम्मूहून मृतदेह घेऊन पटण्याच्या दिशने जात होती. यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स दुभाजकावर आदळून पलटी झाली. त्याचवेळी आग्र्याहून दिल्लीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक अ‍ॅम्ब्युलन्सला बसली.
या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आणि नागरिकांनी मदतकार्य करुन अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढले. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.