धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री करा ; ९० वर्षांच्या आजोबांची भरसभेत शरद पवारांकडे मागणी

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. काल ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांच्या नवगण राजुरी येथील मळ्यात शरद पवार आले असता एका नव्वद वर्षांच्या आजोबांच्या मागणीने शरद पवार चांगलेच बुचकळ्यात पडले. “साहेब दुष्काळ गंभीर आहे पण त्या मुंबईत बसलेल्या देवबाप्पाला काहीच कळत नाही, देशाचा पंतप्रधान सुद्धा बारामतीत येऊन तुमचा सल्ला घेतो, तवा त्या देवबाप्पाला काहीतरी सांगा, नाहीतर शेतकऱ्यासाठी झटणाऱ्या आमच्या धनुभाऊला मुख्यमंत्री करा”, असे उद्गार एका वृद्ध व्यक्तीने शरद पवारांच्या समोर काढले अन् पवारांनी देखील धनंजय मुंडेकडे पहात, हसत हसत करून टाकू असं म्हटलं.

एका बाजूला राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटले जात असताना, धनंजय मुंढे यांना मुख्यमंत्री करा असे जनतेने म्हटल्याने आणि त्याला शरद पवार यांनी होकार दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सध्या दुष्काळी भागांचे दौरे करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते, तेव्हा संदीप क्षीरसागर यांच्या आग्रहावरून ते त्यांच्या छावणीला भेट द्यायला गेले होते. यावेळी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत भविष्य आहे, हेच पवारांच्या स्मितहास्यावरून दिसून आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.