Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 9615 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 13 हजार जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात आठ हजारांच्या वर कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 615 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 24 तासात 278 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 117 वर पोहचली आहे. राज्यात रुग्ण वाढीचा वेग वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 5714 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहे. राज्यात आतापर्यंत 199967 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55 टक्क्यापेक्षा जास्त आहे. राज्यात सध्या 1 लाख 43 हजार 714 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे तांडव सुरु असून गेल्या 24 तासात आणखी 278 जणांना या साथीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 13132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एका राज्यातील हे सर्वाधिक कोरोनामृत्यू आहेत. आज दिवसभरात मुंबईत 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 1057 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज ठाणे महापालीका क्षेत्रात 285 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या 17150 इतकी झाली आहे.