Pune News : ‘फ्री’मध्ये औषध देण्याच्या आमिषाने 70 वर्षीय महिलेला नेले निर्जनस्थळी, अन्….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रास्ता पेठेत दोघांनी भरदिवसा एका 70 वर्षीय महिलेला अडवून फ्रीमध्ये औषध देतो असे सांगत निर्जनस्थळी नेहून त्यांच्या तोंडाला रुमाल लावत लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पेठेत राहतात. त्या बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास औषध आणण्यासाठी जात होत्या. यावेळी एकाने त्यांना येथील परमार ज्वेलर्स समोर गाठले. त्याने “आमच्या शेठला मुलगा झाला आहे, ते फुकट औषध वाटत आहेत माझ्याबरोबर चला” असे सांगितले. फिर्यादी यांना देखील त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. फिर्यादी या एका दुकानासमोर गेल्या. त्याठिकाणी दुसरा एकजण आला व त्याने फिर्यादी यांना पाणी पाजून पुन्हा त्यांची दिशाभूल केली. तसेच तेथून जैन मंदिराजवळ वडाच्या झाडाखाली घेऊन गेला. येथे सुरुवातीस भेटलेला आरोपी फिर्यादीच्या तोंडाला रुमाल लावून दुसऱ्या आरोपीने त्यांच्या दोन्ही हातातील प्रत्येकी एक अशा चार तोळे वजनाच्या 1 लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले. महिलेने आरडाओरडा केला, पण चोरटे पसार झाले होते. अधिक तपास समर्थ पोलिस करत आहेत.