लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, तिघांचा मृत्यू

वडवणी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईकाच्या लग्न समारंभातून परणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीला अद्यात वाहनाने धडक दिल्याने कुटुंबातील तीघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. हा अपघात वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्याजवळ बीड-परळी महामार्गावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. सर्व मयत परभणी तालुक्यातील पाथरी येथील रहिवाशी आहेत.

नंदकुमार उर्फ गणेश कैलास राठोड (वय – २८), रोशन गणेश राठोड (वय – ११) व शोभा गणेश राठोड (वय – २५ सर्व रा.सुंदरनगर तांडा ता.पाथरी) अशी मयतांची नावे आहेत. तर रोहन गणेश राठोड (वय – ४) हा अपघातातून सुदैवाने बचावला आहे.
राठोड हे आपल्या दुचाकीवरून (एमएच २० एएन ९१७) वडवणी तालुक्यातील उपळी येथे लग्न समारंभासाठी गेले होते.

लग्नसमारंभ झाल्यानंतर राठोड कुटुंब दुचाकीवरून गावी परत होते. दुचाकी ब्रम्हनाथ तांड्याजवळ आली असता भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये सर्वजण उडून रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये गणेश, शोभा आणि रोशन यांचा डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रोहन थोडक्यात बचावला.

अपघाताची माहिती मिळताच वडवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, मनोज जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिली.

Loading...
You might also like