पोलिसावर हल्ला करणारा, गुन्हे दाखल असलेल्या गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेश सोहळ्यात शहरातल्या कुख्यात गुंडाला प्रवेश देण्यात आला. पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी संशयित आणि अनेक गुन्हे दाखल असलेल्या देवा सोनारला भाजपत प्रवेश देण्यात आला. यावेळी इतरही काही गुन्हे दाखल असलेले कार्यकर्तेही भाजपामय झाले. विशेष म्हणजे सोनारवर पोलिसांवरच हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
रावसाहेब दानवे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्याधी धुळे आणि जळगावमध्ये भाजपच्या २ गटामध्ये राडा झाला. एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळात कधी घेणार अशी विचारणा, एकनाथ खडसे यांच्या समर्थकांकडून करण्यात आली. यावेळी दानवे यांनी खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यांना नक्कीच स्थान दिलं जाईल, असं सांगून वेळ मारुन नेली. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
दरम्यान, पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांमध्ये काही गुंडांचा समावेश आहे. गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने आश्चर्य़ व्यक्त करण्यात येत आहे. तर विरोधकांकडून भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याची टिपणी करण्यात येत आहे.
धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १० डिसेंबर रोजी होणार आहे. धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.