बंगल्याची बनावट कागदपत्रे देऊन घेतले १ कोटी ६० लाखांचे कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बंगल्याची बनावट कागदपत्रे सादर करून स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या गणेशमळा शाखेतून कर्ज घेत १ कोटी ७५ लाख, ७२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रा दिनेश देशपांडे (५३, वारजे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल दशरथ जाधव (पुणे सोलापूर रोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या पानमळा शाखेच्या व्यवस्थापक आहेत. विशाल जाधव याने त्यांच्या बँकेतून १ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज २०१५ मध्ये घेतले. त्यानंतर त्याने त्याची कर्ज परतफेड सुरु केलीच नाही. याबाबत पडताळणी केल्यावर त्याने बँकेत कर्ज घेताना बंगल्याची बनावट कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले. तसेच त्याने बँकेच्या मुद्दल रक्कम व व्याज असे मिळून १ कोटी ७५ लाख ७२ हजार ३४९ रुपये भरले न भरता फसवणूक केली. त्यानंतर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सलगर करत आहेत.