मोबाईलवर डल्ला मारणारे सराईत गजाआड

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

मार्केटयार्ड येथील गाळ्यांमध्ये कामगारांनी चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरुन विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यांना पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलीसांनी अटक केली आहे. सुनिल अनंता गायके ( वय २९, रा. भाजी मार्केट, मार्केटयार्ड मेंगाई मंदीरा शेजारी, पुणे, मुळ रा. वेल्हा ), ज्ञानेश्वर उर्फ माऊली प्रकाश वाडघरे ( वय २७, रा. अमृता रेसीडन्सी, फ्लॉट नं ४o४, चौथा मजला पेट्रोलपंपामागे मांगडवाडी पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून,यातील अनंता गायके याच्या विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात 2 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस हवालदार अनिल घाडगे यांना आपल्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की, आरोपी हे आंबेडकरनगर जवळ असलेल्या मार्केटयार्ड येथे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून सापळा लावला असता, आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चाैकशी केली असता त्यांनी रात्रीच्या वेळी कामगारांनी मोबाईल चार्जिंगला लावले असता चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून 1 लाख 19 हजार रुपयांचे 11 मोबाईल हॅंन्डसेट जप्त करण्यात आले आहेत. यातील सहा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर इतर पाच मोबाईल मालकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मार्केटयार्ड परिसरात जर कोणाचे मोबाईल चोरीला गेले असतील तर त्यांनी गुन्हे शाखा युनिट 3 च्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.

सदरची कारवाई, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सह पोलीस आयुक्त समीर शेख (गुन्हे-1) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीष शिंदे, सह पोलीस उपनिरीक्षक अशोक भोसले, अनिल घाडगे, अतुल साठे, आजिनाथ काळे, रोहिदास लवांडे, महेंद्र पवार, गजानन गाणबोटे, गुणशिंलन रंगम, अनिल भोसले, शिवानंद स्वामी, संदीप राठोड, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, चालक सुजित पवार यांच्या पथकाने केली.