अहमदनगरच्या मतदान संकल्पपत्राची जागतिक विक्रमामध्ये नोंद

शिक्षण विभागाच्यावतीने सुमारे 20 लाख मतदारांपर्यंत पोहचले जनजागृती अभियान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील ३७-अहमदनगर आणि ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या जनजागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेल्या मतदान संकल्पपत्र भरुन घेण्याच्या उपक्रमाची नोंद जागतिक विश्वविक्रम म्हणून करण्यात आली आहे.

या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे. जागतिक विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रमुख पवन सोलंकी यांनी मा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व स्विप समितीस प्रदान केले आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मतदारदूतांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम जिल्हाभर राबविण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार अहमदनगर/ शिर्डी मतदार संघ लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भारत निवडणूक आयोगाच्या स्विप- मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत ‘आमचा संकल्प100% मतदानाचा’ या घोषवाक्यासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सुमारे 20 लाख 53 हजार600 मतदार नागरिकांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. मुलांचा संकल्प, आई-वडिलांचा संकल्प व सामान्य नागरिकाचा संकल्प अशा विविध प्रकारांमध्ये मतदार जनजागृतीचा उपक्रम संपन्न होत असताना

राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श ठरणारी नगर जिल्ह्याच्या संकल्प पत्राची ही संकल्पना विभागीय आयुक्त तथा स्वीप मोहिमेचे विभाग निरीक्षक राजाराम माने यांनी देखील या उपक्रमाला राज्यपातळी तथा राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.संकल्प पत्र मोहिमेची पीपीटी स्वीप निरीक्षक समितिच्या संपूर्ण राज्यभर प्रसारित करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे पाच हजार पेक्षा जास्त शाळांमधीलअंगणवाडी पासून ते बारावी पर्यंत साधारणत: नऊ लाख तीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्वीप समितीच्या संकल्पपत्र या आगळ्यावेगळ्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संकल्प पत्र देण्यात आले होते. सदर संकल्पपत्र विद्यार्थ्यांनी पालकांकडून व घरातील सदस्यांकडून भरून घ्यावयाचे होते. यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील 20 हजारपेक्षा जास्त शिक्षकांचा देखील समावेश होता.जिल्ह्यातील मतदारांची संख्या 33 लाख93 हजार 88 एवढी असताना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढावी हा या उपक्रमाला पाठीमागचा हेतू होता.

संकल्प पत्राचे दोन भाग करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याविषयी आवाहन होते. दुसऱ्या भागात पालकांनी स्वतः मतदान करू असा संकल्प करावयाचा असून त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील इतर पात्र मतदारांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करू, अशा आशयाचा मजकूर संकल्प पत्रामध्ये होता. त्याचबरोबर संकल्प पत्राबरोबर मतदार यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी व मतदान केंद्राच्या अन्य माहितीसाठी डायल करा 1950, एनव्हीएसपी, वोटर हेल्पलाइन,सुविधा, पीडब्ल्यूडी, सी-व्हीजील या भारत निवडणूक आयोगाच्या प्रसार घटकांचा देखील समावेश संकल्प पत्रावर करण्यात आला होता.

या उपक्रमासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील,तहसीलदार निवडणूक हेमा बडे, स्वीप नोडल ऑफिसर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम,शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काठमोरे, मतदार दूत डॉ.अमोल बागुल आदींनी मार्गदर्शन केले आहे.

“आम्ही असा संकल्प करतो की आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखून प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म ,वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू तसेच आमच्या कुटुंबातील सर्व मतदार शेजारी व मित्रपरिवार यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू,” अशा प्रकारचा मजकूर या संकल्पपत्रात आहे.