स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिल्डरने कार्यालयात स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर येथे उघडकीस आला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. संजय अग्रवाल (वय-५७) असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्यांचे नातेवाईक त्यांच्या केबिनबाहेर होते. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेंबूरमधले प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल हे संजोना विकासकचे मालक आहेत. त्यांनी घरात परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेतल्या. त्यांच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.चेंबूर येथील सिंधी कॉलनीमध्ये सन्जोना कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते होते. त्याच ठिकाणी त्यांचे कार्यालय देखील आहे. आज सकाळी ११.२५ वाजताच्या दरम्यान त्यांनी राहत्या घरी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेतली. नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
त्यांच्या आत्महत्येमागील कारण मात्र समोर आलेले नाही असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील १० व्या रोडवरील प्रकल्प दिवसेंदिवस रेंगाळत असल्याने अग्रवाल तणावाखाली होते. त्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.