१२ लाखांचा गंडा घालणारा शिक्षक गजाआड

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – वन विभागात मुलाला नोकरी लावून देतो असे सांगून १२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या शिक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गणेश ज्ञानेश्वर पाटील (वय – ३६ रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव असून त्याने चाळीसगाव तालुक्यातील अनेकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी दिलीप अर्जुन पगारे (रा. बहाळ. ता. चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

दिलीप पगारे यांच्या मुलाला वन विभागात गार्ड म्हणून नोकरी लावून देण्यासाठी गणेश याने १२ लाख तर त्याच्या आणखी काही मित्रांकडून पैसे घेतले. गणेश पाटील याने ६ जानेवारी २०१४ मध्ये पैसे घेतले होते. पैसे देऊनही त्याने नोकरी लावली नाही आणि पैसेही परत केले नाहीत. दिलीप पगारे यांनी याची तक्रार मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिली होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी.जी. रोहोम यांनी हेड कॉन्स्टेबल अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, सचिन महाजन व दर्शन ढाकणे यांचे एक पथक गणेश याच्या मुळ गावी पाठविले होते. या पथकाने त्याला गावातून ताब्यात घेतले. गणेश हा उच्च शिक्षित असून मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.