सरकारी नोकरीच्या आमिषाने चौघांना गंडवले

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – सरकारी नोकरीचे आमिष दाखवून चार जणांना सहा लाख ५२ हजारांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी योगेश नामदेव वर्पे (रा. देवगाव, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सन २०१२ ते २०१९ या सात वर्षाच्या काळात वर्पे याने फसवणुक केल्याची फिर्याद निलेश अरूण गणोरे (वय ३८, रा. इंदिरनगर, गल्ली क्रमांक २) यांनी दिली आहे. पोलीसांनी वर्पे याला अटक केली आहे. २०१५ नंतर वर्पे याने अशाच प्रकारची फसवणूक करून किरण शंकर आव्हाड यांच्याकडून २ लाख ५० हजार, मंगल अनिल उनवणे यांच्याकडून १ लाख २७ हजार व रविंद्र रामचंद्र कासार यांच्याकडून १ लाख २५ हजार असे एकूण पाच लाख दोन हजार रुपये तसेच निलेश गणोरे यांनी दिलेले १ लाख ५० हजार अशी सर्व रक्कम मिळून या चार जणांची सहा लाख ५२ हजारांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम तपास करीत आहेत.
निलेश गणोरे यांचे दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून, २०१२ ला संगमनेरातील एका कापड दुकानात ते कामाला होते. त्यांची योगेश वर्पे याच्यासोबत ओळख झाली. माझ्या अनेक ठिकाणी ओळखी आहेत. तुला चांगले ठिकाणी शिपाई म्हणून काम लावून देतो. तुझी पैसे खर्च करण्याची तयारी असल्यास सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष वर्पे याने दाखविले.
२०१३ ला शिक्षण विभागात नोकरी लावून देणार असल्याचे सांगत वर्पे याने निलेश गणोरे यांसह त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या. फोटो व त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये घेतले. त्यानंतर २०१४ ला वर्पे याने शिक्षण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी लागल्याचे नियुक्ती पत्र गणोरे यांना दाखवित त्यांच्याकडून पुन्हा ८० हजार रुपये घेतले. भरती निघाल्यानंतर तुझे काम होईल, असे सांगितले. त्यानंतर गणोरे यांनी त्याच्याकडे नियुक्ती पत्राची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यात सुरवात केली. अनेक दिवस उलटूनही नोकरी लागत नसल्याने गणोरे यांनी वर्पेकडे नोकरी लावण्यासाठी दिलेल्या १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर गणोरे यांना त्याने धमकावण्यास सुरवात केली.