हिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी ‘बानाई’चं मंदिर ! (व्हिडीओ)

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण अशा एका गावाबद्दल माहिती घेणार आहोत जिथं देवा खंडेरायांची पत्नी बानाईचं मंदिर आहे. हे गाव हिरवळीनं नटलेलं आणि डोंगरकुशीत वसलेलं आहे. गावातील एका शाळेत गरजूंची मोफत राहण्याची आणि शिक्षणाची देखील सोय आहे. या गावाचं नाव आहे बनवस. हे गाव परभणी जिल्ह्यात आहे.

बनवस हे गाव मोठं असल्यानं या गावात 4-5 शाळा आहेत. गावातील आचार्य विनोबा भावे कनिष्ठ महाविद्यालय या शाळेची इमारतही खूप भव्य आहे. परिसरात गर्द झाडीही आहे. शाळेतील भिंतही ज्ञानाचं प्रतिक आहे. यावरील सुविचार, चित्र सर्वांना प्रेरणा देतात. गरजू विद्यार्थ्यांना जे गरीबीमुळं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना मोफत शिक्षण, राहणं, सर्वकाही विनामूल्य आहे.

गावात तलावाच्या काठी बानाईचं मंदिर उभं आहे. पाण्यावर मंदिराचं छान असं प्रतिबिंब दिसतं. पंचक्रोशीत महादेवाची खूप मोठी पिंड गावातील याच मंदिरात पाहायला मिळते. बानाईचं हे मंदिर खूपच लोकप्रिय आहे. प्रत्येक दिवशी गावकरी मनोभावे पूजा करण्यासाठी इथं येतात आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. गावात नदीकाठी मारूतीचं मंदिरही पाहायला मिळतं.

पूर्वीच्या काळात या गावात किल्ल्यांचं बांधकाम सुरू करण्यात आलं होतं पंरतु काही कारणांमुळं ते अपुरं राहिलं. याचे पुरावे आजही गावात पाहायला मिळतात.