हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या IT इंजिनिअर तरूणी मुलाखतीसाठी पुण्यात, पैसे संपल्यानंतर झालं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या महामारीत बंगळुरू येथील आयटी इंजिनिअर तरुणीची नोकरी गेली. त्यातच पुण्यातील एका नामांकित कंपनीत भरती निघाल्यानंतर तिने अर्ज केला आणि मुलाखत देण्यासाठी आली. मुलाखत दिल्यानंतर मात्र तिची चांगलीच अडचण झाली. पुण्यात ना नातेवाईक ना मित्र त्यामुळे तिच्या राहण्याची सोय होत नव्हती. त्यात हातावर होम क्वारंटईनचा शिक्का मारलेला असल्याने कोणी रूमही देईना. तर जवळचे पैसेही संपत आलेले. मग तिने येरवडा पोलिस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत सांगितली. यावेळी वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख आणि पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी तिला धीर देत रात्री पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी विश्रांतीग्रह येथेच सोय केली. तिच्यासोबत दोन महिला कर्मचाऱ्याना देखील ठेवले. तसेच दुसऱ्या दिवशी तिच्या राहण्याची सोय करून देत तिला काही पैसेही दिले. ती पुणे पोलिसांनी केलेल्या मदतीने भारावून गेली व आनंदी अश्रूंनी पोलिसांचे आभार मानले.

कोलकता येथील बैसाखी वैजुनाथ यादव (वय २४) असे या तरुणीचे नाव आहे. यादव हिचे शिक्षण बीएस्सी फिजिक्सपर्यंत झाले आहे. ती बंगलोर येथील एका कंपनीत नोकरीला होती. पण, तिची लॉकडाउनमध्ये नोकरी गेली. काही दिवस ती नोकरीच्या शोधात होती. पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या टेक महिंद्रा कंपनीत नोकरीसाठी जागा शिल्लक असल्याचे समजले. तिने नोकरीसाठी अर्ज केला. त्यानुसार ती २९ जून रोजी मुलाखतीसाठी पुण्यात आली. ती १८ जून रोजी बंगळुरू येथून रेल्वेने पुण्यात आली. पुणे रेल्वे स्टेशन येथे उतरल्यानंतर तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. पण ती प्रथमच पुण्यात आलेली. तिचे मित्र किंवा नातेवाईकही नाहीत. त्यामुळे तिने पेइंग गेस्ट राहण्यासाठी खोली शोधत होती. पण, तिला खोली मिळाली नाही.

तरुणीला रात्री दहा वाजेपर्यंत खोली मिळाली नाही. तसेच, तिच्याकडे फक्त शंभर रुपये होते. त्यामुळे तिने येरवडा पोलिस ठाण्यात जाऊन सर्व परिस्थिती सांगितली. तसेच, तिने मदतीसाठी पोलिसांकडे विनंती केली. पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी तरुणीला सुरक्षित अंतराचे पालन करून रात्रभर महिला पोलिसांच्या विश्रांती कक्षात राहण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली. तिच्या राहण्यासाठी सर्वांनी पैसे गोळा करून दिले. त्यानंतर कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी त्यांची दशभुजा गणपती मंदिराजवळ तिला भाड्याची खोली मिळवून देत राहण्याची व्यवस्था केला. येरवडा ठाण्याचा महिला पोलिसांनी तरुणीला तिच्या रुमपर्यंत सोडून आल्या. पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे तरुणीने त्यांचे आभार मानले.