इतर ‘आजारां’साठी रुग्णालयात गेला पण झाली ‘कोरोना’ची लागण, तरुण पत्रकारानं गमावला जीव

हैदराबाद : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हैदराबाद येथे रविवारी (दि.7) सकाळी एका तेलगू वृत्तवाहिनीच्या तरुण पत्रकाराचा मृत्यू झाला. मनोज कुमार असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. एक दिवसांपूर्वीच मनोज कुमार याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

मनोज कुमार हा मायस्थेनिया ग्रेविस या आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर हैदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मनोजवर थाइमस ग्रंथीची सर्जरी करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरु असानाच त्यांने रविवारी सकाळी 9.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. मोनोज कुमार याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यात त्याला निमोनियाही झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे गांधी हॉस्पिटलच्या सुत्रांनी सांगितले.

भारतात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासात तब्बल 9971 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा 2.46 लाखांवर पोहचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 1 लाख 19 हजार रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.