Pooja Chavan Suicide Case : आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘मी यावर माहिती घेऊन बोलेन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली होती. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यामुळंच तरुणीनं आत्महत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यातील विविध ऑडिओ क्लीप देखील सोशलवर व्हायरल झाल्या आहेत. यानंतर आता राजकीय वर्तुळातही खळबळ उडालेली दिसत आहे. शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानंतर यावर बोलताना शिवसेनेचे नेते आता सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. काही नेते तर यावर बोलणंही टाळत आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सावध भूमिका घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव पुढं येत आहे. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता ते म्हणाले, मला याबाबत माहिती नाही. मी यावर माहिती घेऊन बोलेन अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रत्नागिरीत ते माध्यमांशी बोलताना असताना त्यांनी यावर भाष्य केलं.

या प्रकरणी आता विविध ऑडिओ क्लीप्स व्हायरल झाल्याचंही पाहायला मिळत आहेत. एक कार्यकर्ता आणि कथित मंत्री यांच्यात फोनवरून त्या तरुणीबद्दल संवाद झाल्याचं ऐकायला मिळत आहे. इतकंच नाही तर तरुणीच्या आत्महत्येनंतरही त्यांच्यात बोलणं झाल्याचं यावरून समोर येताना दिसत आहे.

आता सरकार या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष देण्याची शक्यता आहे. कारण भाजपनं आता हा मुद्दा उचलून धरला आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी तर महाविकास आघाडीच्या मंत्र्याचं थेट नाव घेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. संजय राठोड यांनीच पुजाला आत्महत्येला परावृत्त केलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी 12 ऑडिओ क्लीप्स हाती लागल्याचा दावा केला आहे. त्यांनी याच्या प्रती पोलीस महासंचालकास पाठवल्या आहेत. यावरून फडणवीसांनीही या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.