टीव्ही अभिनेत्याला पोलिसांकडून ‘थर्ड डिग्री टॉर्चर’ ?

गाझियाबाद : वृत्तसंस्था – एका टिव्ही अभिनेत्याने गाझियाबाद पोलिसांनी आपल्याला ‘थर्ड डिग्री टॉर्चर’ केल्याचा आरोप केला आहे. ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत काम करणाऱ्या अंश अरोराने हा आरोप केला आहे. याप्रकरणी त्याने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून त्याच्यावर सध्या गाझियाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंश अरोरा हा ११ मे रोजी गाझीयाबाद येथील स्टोरमध्ये गेला होता. त्यावेळी स्टोरमधील कर्मचारी आणि अंश यांच्यामध्ये वाद झाले. त्यामुळे चिडलेल्या अंशने स्टोरमध्ये तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला.
अंश अरोराने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ११ मे रोजी स्टोरमध्ये खाण्याची ऑर्डर देण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी मला तासभर प्रतीक्षा करावी लागली.
https://www.instagram.com/p/BxmNTUHhgBY/?utm_source=ig_embed

त्यामुळे खाण्याची ऑर्डर रद्द केली. त्यावेळी स्टोरमधील कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले. यानंतर मी माफी मागण्यासाठी गेलो असताना या स्टोरच्या मालकांनी माला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून बेदम मारहाण केली. तसेच माझ्या भावाला देखील मारहाण करून कुटुंबाला शिवीगाळ केली. पोलिसांच्या मारहाणीमुळे माझी प्रकृती बिघडल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंश अरोरा याने सोशल मीडियावर रुग्णालयात उपचार घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

अंशने मानवाधिकार आयोगाला पत्र लिहले आहे. या पत्रात त्याने, जेव्हा मी पोलीस ठाण्यात पोहचलो तेव्हा तेथील पाच ते सहा पोलिसांनी मला आणि माझ्या भावाला दांड्याने मारण्यास सुरुवात केली. तसेच कुटुंबाला शिवीगाळ केल्याचे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, गाझीयाबाद पोलिसांनी अंश अरोरा याने केलेले आरोप फेटळून लावले आहेत.