दिल्लीत अखेर आप – काँग्रेसची आघाडी नक्की

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आघाडी होणार की नाही अशी गेल्या काही दिवस गाजत असलेल्या आप – काँग्रेस यांच्यातील आघाडी अखेर प्रत्यक्षात आली आहे. दिल्लीतील ७ जागांपैकी आप ४ तर काँग्रेस ३ जागा लढविणार आहे. दोन्ही पक्ष दिल्ली आणि हरियानामध्ये एकत्र येऊन निवडणुका लढविण्यावर त्यांच्यात एकमत झाले आहे.

नवी दिल्ली, चांदणी चौक आणि नॉर्थ वेस्ट या तीन जागा काँग्रेस लढविणार असून ईस्ट दिल्ली, नॉर्थ ईस्ट, वेस्ट दिल्ली आणि साऊथ दिल्ली या जागा आप लढविणार आहे. हरियानातील लोकसभेच्या १० जागावरही दोन्ही पक्षात एकमत झाले असून तेथे आप एक जागा लढविण्याची शक्यता आहे. गुडगावमधून आप एक जागा लढविणार असून त्यांची आणखी एक जागा मिळावी अशी मागणी आहे़.

गेले अनेक दिवस दोन्ही पक्षात आघाडी करण्यावर चर्चा सुरु होती. मात्र माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा त्याला विरोध होता तर, पी़ सी़ चाको हे आघाडी करण्याच्या बाजूने होते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकून देशभरात सर्वांना एकच धक्का दिला होता.

आतापर्यंत केलेल्या सर्व्हेमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपला पराभूत करु शकतात, असे दिसून आले होते. त्यामुळे आघाडी करायला आप तयार होती. मात्र, काँग्रेसमध्ये असलेल्या परस्परविरोधामुळे आघाडी होण्यास उशीर होत होता.

Loading...
You might also like