अ‍ॅट्रॉसिटीचं कलम न लावण्यासाठी 5 हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अदखलपात्र गुन्हयात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम न लावण्यासाठी 7 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पोलिस कर्मचारी हा सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील आहे.

महावीर नारायण बरकडे (पोलिस नाईक, बक्कल नंबर 349) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदविली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज (दि. 5 मार्च) रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी सरकारी पंचा समक्ष पोलिस कर्मचारी महावीर नारायण बरकडे यांनी तडजोडीअंती 5 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर, पोलिस कर्मचारी चंद्रकांत पवार, अतुल घाडगे, प्रमोद पकाले आणि प्रफुल्ल जानराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.