मंदिराचे राजकारण करणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करा : अबू आझमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – राम मंदिर उभारण्याचा मुद्दा काही पक्षांना निवडणूक काळातच आठवतो. कोर्टाने जर अयोध्यामध्ये मंदिर उभारण्यास सांगितले तर नक्कीच उभारा, मात्र, कोर्टाने जर मज्जीद उभारण्यास सांगितले तर मज्जीद बांधायला तयार रहा. मंदिरांवर जे राजकारण करत आहेत, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबतचे पत्र मी न्यायालयाला दिले आहे, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिली. ते नाशिक येथे आयोजित लोकतंत्र बचाव महारॅलीमध्ये बोलत होते.

यावेळी अबू आझमी यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. आझमी म्हणाले, यांचे वडील कधीच आयोध्येत गेले नाहीत आणि उद्धव ठाकरे तिकडे निघाले आहेत. वंदे मातरमच्या सक्तीबाबत आझमी म्हणाले, वंदे मातरम म्हणायला काहीही हरकत नाही. मात्र, मुस्लिमांमध्ये फक्त अल्ला समोर डोकं ठेवतात. आई बापासमोर नाही. सारे जहाँसे अच्छा असा नारा देणारे मुसलमान होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरचे कुणी नव्हते, अशी बोचरी टीका आझमी यांनी शिवसेनेवर केली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत आझमी म्हणाले, असा कोणताच मुसलमान नाही जो मज्जीदमध्ये बॉम्ब फोडेल. तसेच मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आले, तर मोदींचे दुकान बंद होईल. मुस्लिम धर्माशी खेळू नका मोठे मोठे हारले तुम्ही काहीच नाही, असे म्हणत तलाकच्या निर्णयाचा आझमी यांनी निषेध व्यक्त केला. हिंदू मुस्लिम धर्मात भांडण लावण्याचे काम सुरू आहे. मोदी आणि फडणवीस मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहेत. लोक उघड्यावर शौचालय करत आहेत, रेल्वे रुळाच्या बाजूला लोक उघड्यावर बसलेले फडणवीसांना दिसत नाही का? सरकारने गाय बैलासाठी गोठे बांधून त्यांचा सांभाळ करावा तरच त्यांना खरे हिंदू म्हणू, असे आझमी म्हणाले. नवज्योत qसग सिद्धू पाकिस्तानला गेले तर एवढे आरोप झाले. मात्र, मोदी तेथे गेले असता पंतप्रधान नवाझ शरिफांच्या आईच्या पाया पडले आणि केकही कापला, असे म्हणत आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

केंद्र सरकारवर टीका करताना आझमी म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीबाबत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याशी दिवसा नाही, तर कमीत कमी रात्री चर्चा करुन निर्णय घेतला असता तर वाईट परिस्थिती झाली नसती. नोटबंदीमुळे पाच करोड जनता बेरोजगार झाली. दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आपण म्हणता अच्छे दिन आले. शंभर दिवसात काळेधन आणतो म्हणाले, आणले का, आणि चूक झाली तर फाशी द्या असेही मोदींनी म्हटले होते. सरकार रोजगार देत नाही पण लोकांना पळवत आहे, असा आरोप आझमी यांनी केला.