अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांवर महिलेच्या छळाचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – गृहनिर्माण संस्थेतील पार्किंगच्या वादातून 62 वर्षीय विधवा महिलेची छळवणूक केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबय्या शण्मुगम यांच्यावर करण्यात आला आहे. तिच्या दारात जाऊन त्यांनी मूत्रविसर्जन केले, तसेच शस्त्रक्रियेसाठी वापरलेल्या मास्क घराजवळ फेकल्याची तक्रार या महिलेने पोलिसांकडे केली आहे. सोसायटीत महिलेच्या मालकीची पार्किंगची जागा असून डॉ. शण्मुगम यांच्याकडे तिने ही जागा वापरण्याच्या बदल्यात मोबदला म्हणून पैसे मागितले होते. त्यावरुन वाद झाला असण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी सांगितले, की महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून तक्रारीची पोच देण्यात आली आहे. शण्मुगम हे रोयापेट रुग्णालय व किलपॉक वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक आहेत. यावर त्यांनी ही तक्रार खोटी असून सीसीटीव्ही चित्रणही बनावट आहे. यात काही वेगळेच हेतू असण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर अभाविपच्या पदाधिकार्‍यांना विचारा असे सांगितले. अभाविपच्या राष्ट्रीय सरचिटणीस निधी त्रिपाठी यांनी सांगितले, शण्मुगम कुटुंबीय व तक्रारदार महिला यांच्यात पार्किंगच्या जागेवरून वाद झाला होता. त्यांच्यात चर्चा झाली होती. महिलने छळवणुकीचे जे आरोप केले आहेत ते गैरसमजातून केले असून ते खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.