सहाय्यक निबंधक 9 हजार 500 ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड: पोलीसनामा ऑनलाइन – सहकारी संस्थेस मंजुरी देवुन प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करून 9 हजार 500 रूपयाची लाच स्विकारणार्‍या बीड येथील सहाय्यक निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

विठ्ठल नामदेव जोगदंड (57, रा पोस्टमन कॉलनी, सिंहगड लॉन्सच्या पाठीमागे, बीड) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहाय्यक निबंधकाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदाराने दि. 22 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. तक्रारदाराने वडवणी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात जनार्धन स्वामी शेती प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित खडकी या नावाने संस्था मंजुर होण्यासाठी फाईल दाखल केलेली होती. सदरील संस्था मंजूर करून प्रमाणपत्र देण्यासाठी जोगदंड यांनी 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे याबाबत तक्रार नोंदविली. दि. 22 फेब्रुवारी रोजी पडताळणी करताना जोगदंड यांनी 500 रूपये स्विकारले होते. उर्वरित रक्‍कम म्हणजेच 9 हजार 500 रूपये स्विकारताना त्यांना सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. बीड अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.