जप्त केलेला JCB परत देण्यासाठी शेतकर्‍याला मागितली 1 लाखाची लाच, तीन वनकर्मचार्‍यांसह चौघांना ACB कडून अटक

अमरावती/तिवसा : पोलीसनामा ऑनलाईन – वनविभागाच्या जमिनीवर खोदकाम केल्याची बतावणी करून जप्त केलेला जेसीबी सोडविण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वनविभागाच्या तीन कर्मचार्‍यांसह एका अन्य व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने मंगळवारी (दि. 29) अटक केली आहे.

वनपाल सुरेश संपतराव मनगटे (53), वनरक्षक प्रभुदयाल प्रकाश चौधरी (39) , वनमजूर संजय वासुदेवराव माहोरे (56) आणि तिवसा येथील रहिवसी प्रशांत राजेंद्र भडके (37 )अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमरावती येथे राहणाऱ्या शेतकऱ्याला वनजमिनीवर खोदकाम केल्याचे सांगून त्याचा जेसीबी ताब्यात घेण्यात आला होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी व जेसीबी सोडविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी प्रशांत घोडकेमार्फत देण्यास कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. त्यासाठी शेतकऱ्याला मार्डी ते वऱ्हा मार्गावरील चिखली फाट्यावर बोलावले होते.

प्रकरणाची पडताळणी 24 डिसेंबर रोजी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांना सदर तक्रारीबाबत कळविल्यानंतर 28 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, सहायक उपनिरीक्षक श्रीकृष्ण तालन, पोलीस नायक सुनील युवराज राठोड, पोलीस शिपाई अभय वाघ, तुषार देशमुख, वाहनचालक चंद्रशेखर जनबंधू यांनी सापळा रचून लाचखोरांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.