16000 रुपयाची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच मागून 16 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या खेड तालुक्यातील खराबवाडी ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.19) खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे गावात खळबळ उडाली आहे. बाळु बबन मलगे असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

बाळु मलगे याच्या विरोधात 60 वर्षीय शेतकऱ्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या 8/अ उताऱ्यावर नोंदी करुन देण्यासाठी मलगे याने 20 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 16 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळी केली असता मलगे याने 16 हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून बाळु मलगे याला तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like