15 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी आणि पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागून 15 हजार रुपयाचा पहिला हप्ता घेताना कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण त्रिंबक गाडे (वय-38 रा. चिंतामणी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर २, जन कल्याण शाळेच्या मागे, शहापूर, जि.ठाणे) याला खासगी इसम हेमंत वसंत भगत (वय-38 रा. केडीएमसी शाळेसमोर, गणपती मंदिर, टिटवाळा (पु).) याच्या मार्फत तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी (दि.11) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास करण्यात आली आली.

याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांची 5 रुमच्या चाळीचे बांधकाम असून हे बांधकाम महानगरपालिकेने अनधिकृत ठरवले आहे. महापालिकेमार्फत कारवाई न करण्यासाठी आणि बांधकाम सुरु ठेवण्यासाठी पोलीस नाईक नारायण गाडे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडीमध्ये 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी 6 मार्च रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.

लाचलुचपत विभागाने तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली. त्यावेळी पोलीस नाईक गाडे याने खासगी इसम हेमंत भगत याच्याकडे ठरलेल्या रक्कमेपैकी 15 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार सापळा रचून खासगी इसम हेमंत भगत याला पोलीस नाईक गाडे याच्यासाठी 15 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती, पोलीस हवालदार घेवारी, परदेशी, खाबडे, महिला पोलीस नाईक पाटील, चालक पोलीस हवालदार महाले यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.