1000 रुपयाची लाच घेताना वनपाल ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

कन्नड/औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – रोपांचे व खतांचे बिल काढून देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक वनिकरण विभागाच्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.27) करण्यात आली. भगवान कौतिकराव मगर असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कन्नडचे वनपाल भगवान मगर याने तक्रारदार यांचे रोपांचे व खतांचे बिल काढून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती एक हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिंचोली लिंबाजी येथे सापळा रचून एक हजार रुपयाची लाच घेताना भगवान मगर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुंभांगी सुर्यवंशी, पोलीस नाईक बाळासाहेब राठोड, पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र सीनकर, चांगदेव बागुल यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.