दुर्देवी ! बीडमध्ये ड्युटी करुन परतणार्‍या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

 बीड : पोलीसनामा ऑनलाइन – चेक पोस्टवर ड्युटी करुन परतणार्‍या शिक्षकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. शिरुर जवळच्या तागडगाव फाट्यावर रविवारी (14 जून) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशांत डी. कुलकर्णी असे या शिक्षकाचे नाव असून ते लोणीतील शाळेत कार्यरत होते.

मृत्युमुखी पडलेले शिक्षक बीड आणि नगरच्या सीमेवर असलेल्या मानूर येथील चेक पोस्टवर कार्यरत होते. काल रात्री साडेसात वाजता ड्युटी संपल्यानंतर ते स्वत:च्या स्विफ्ट कारमधून बीड इथल्या घरी निघाले होते. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. रायमोह ते शिरुर रस्त्यावर तागडगांव फाट्याजवळ टाटा सुमो आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात शिक्षक प्रशांत डी कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना उपचारांसाठी बीडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा अपघात इतका भीषण होता की ड्रायव्हिंग सीटवर बसलेले प्रशांत कुलकर्णी स्वतःच्या बचावासाठी उठून सुद्धा शकले नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,कोरोनामुळे राज्यभरात शाळा बंद असून शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची कामे देण्यात आली आहेत. अगदी रेशन दुकानावरील धान्याच्या नोंदी ठेवण्यापासून ते किराणा घरपोच करण्यार्‍या डिलिव्हरी बॉयप्रमाणे काम शिक्षकांना करावे लागत आहेत. चेकपोस्टवर बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्‍या व्यक्तींची नोंद घेण्याचे काम सुद्धा मागच्या दोन अडीच महिन्यांपासून शिक्षक करत आहेत.