आईसह 18 वर्षांच्या मुलीचा खून करून फरार झालेल्या आरोपीची हिंगोलीतील मूळ गावी आत्महत्या !

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – पनवेलमध्ये मायलेकीची हत्या करून फरार झालेला आरोपी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी लपून होता. त्यानं तालुक्यातील वैजापूर शिवारात गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटनी उघडकीस आली आहे.

दुहेरी हत्याकांड करून आरोपी फरार
दि 18 फेब्रुवारी रोजी पनवेल तालुक्यातील दापोली गावातून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली होती. लग्नास नकार दिल्यानं आई आणि मुलीची धारदार शस्त्रानं हत्या करून आरोपी फरार झाला होता. सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुरेखा बलखंडे (आई) आणि सुजाता बलखंडे (मुलगी) असं खून झालेल्या मायलेकींची नावं आहेत. सुरेखाचा नवराही या घटनेत जखमी झाला होता. पनवेलीमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. ते पनवेल तालुक्यातील दापोली गावचे रहिवाशी आहेत.

आरोपी प्रकाश यशवंता मोरे (26, रा. पहेनी, ता. जि. हिंगोली) या घटनेनंतर फरार झाला होता. तो त्याच्या मूळ गावी पहेनी शिवारात लपून बसला होता. रविवारी 3 वाजताच्या सुमारास आरोपीनं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

नेमकं प्रकरण काय ?
सिद्धार्थ बलखंडे आणि सुरेखा बलखंडे (रा. रूपूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे दाम्प्त्य काही वर्षांपासून पनवेल येथील कंपनीत काम करण्यासाठी गेलं होतं. आरोपी प्रकाश हाही पनवेल या ठिकाणी टिप्पर चालकाचं काम करत होता. प्रकाश आणि बलखंडे दाम्पत्य एकाच चाळीत रहात होते. हिंगोली जिल्ह्यातील असल्यानं दोघांचीही ओळख होती.

आरोपी प्रकाश यानं सिद्धार्थ बलखंडे आणि सुरेखा बलखंडे यांची 18 वर्षांची मुलगी सुजाता हिला लग्नासाठी मागणी घातली. काही दिवसांपासून त्यानं लग्नासाठी तगादाही लावला होता. परंतु प्रकाश याचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी बाळंतपणात मृत पावली होती. त्यामुळं सुजाताचे वडिल सिद्धार्थ यांनी या लग्नास नकार दिला होता.

आरोपी प्रकाश यानं 18 फेब्रुवारी रोजी देखील लग्नाचा विषय काढला. यावेळीही मुलीच्या वडिलांनी म्हणजेच सिद्धार्थ यांनी लग्नास पुन्हा नकार दिला. त्यावेळी रागाच्या भरात प्रकाशनं बलखंडे दाम्पत्यावर हल्ला केला. या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर वडिलांना गंभीर दुखापत झाली. आई आणि मुलीची हत्या केल्यानंतर प्रकाश फरार झाला होता.

मूळ गावी दडून बसला आरोपी
फरार झाल्यानंतर आरोपी प्रकाश हा मूळ गावी पहेनी शिवारात दडून बसला. रविवारी 3 वाजताच्या सुमारास प्रकाशनं माळरानावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व मुंबई पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.