धक्कादायक ! अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार गावात बसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपींनी बुधवारी (दि.18) अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून दोन तरुण पीडित 22 वर्षीय तरुणी जवळ आले. त्यांनी तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तात्काळ फरार झाले. काय घडले हे कळायच्या आतच त्यांनी तेथून पळ काढला. ही तरुणी नागपुरमध्ये शिक्षण घेत असून ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली असताना ही घटना घडली.

या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खळबंधा गावात राहणारी आचल कळनबे हि नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत असून सुट्ट्यांसाठी काही दिवसांपूर्वी ती गावी आली होती.

आचल आज नागपूरला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली असता, एका दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी आचलवर अ‍ॅसिड फेकून तेथून पळून गेले. गावकऱ्यांनी या हल्ल्याची माहिती पोलिसांना देत पीडितेला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, आचलची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपुरला हलवण्यात आले. गंगाझरी पोलीसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/