Coronavirus : मॉर्निंग वॉकला गेलल्या पत्रकार, सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्याचा ‘दणका’, 6 जण ताब्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हासरचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात मॉर्निंग वॉक करण्यासाठी निघालेल्या पत्रकार, सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दणका दिला आहे. बुधवारी (दि.1) सकाळी जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई करून सहा जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये माजी समाजकल्याण सभापती बालाजी कांबळे यांच्यासह पत्रकार व एक महसूल मंडळ अधिकाऱ्याचा समावेश आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. असे असताना देखील अनेकजण संचारबंदीचे उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले असतानाही काहीजण रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत आहेत. पोलिसांकडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र नागरिकांवर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे पाचनंबर चौकातून रिंगरोडने जात असताना त्यांना अनेकजण मॉर्निंग वॉक करताना दिसून आले. त्यांनी गाडीतून उतरत फिरणाऱ्यांकडे विचारणा करण्यापूर्वीच काही जणांनी त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी प्रतिसाद देतील असे सर्वांना वाटले होते. परंतु जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सर्वांना एप्रिल फुल करत त्या सर्वांना पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाईत जिल्हा परिषदेचे माजी सभापती कांबळे, औसा तालुक्यातील बेलकुंड येथील मंडळ अधिकारी सुरेश सोनकांबळे व एका मुक्त पत्रकाराचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांनी सकाळीच केलेल्या कारवाईमुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.