वाघाच्या ‘कोअर झोन’ मध्ये शिरणाऱ्या पुण्याचा १२ पर्यटकांवर कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर झोन’ (अतिविशेष भाग) मध्ये शिरणाऱ्या पुण्याच्या १२ पर्यटकांवर प्रवेश केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणे, तसेच बेकायदा प्रवेश यामुळे त्यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने ही अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे म्हणाले की,”सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही जणांनी बेकायदा प्रवेश केल्याची माहिती आम्हाला स्थानिक नागरिकांकडून मिळाली. सातारा जिल्ह्यातील शिरशिंगे गावानजीक हा प्रकल्प असून, बुद्धपौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडली. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकारी, कर्मचारी यांनी त्या भागात जाऊन तपास केला असता त्या ठिकाणी १२ युवक आढळले. ज्या १२ युवकांना अटक करण्यात आली, ते पुणे आणि सातारा या भागातील असून, त्यांना परिसराची माहिती होती. ‘‘आम्हाला रस्ता माहिती नव्हता, त्यामुळे आम्ही चुकून त्या रस्त्याने गेलो, तसेच यापुढे काळजी घेऊ. पुन्हा त्या रस्त्याने जाणार नाही,’’ असे सांगत माफी मागितली. त्या वेळी वनविभागाने ती जागा प्रवेश निषिद्ध असून संबंधित जागी प्रवेश करणाऱ्यांवर अपप्रवेश म्हणून गुन्हा दाखल करता येतो.”

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व्ही क्लेमेंट बेन म्हणाले की,”सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर हा प्रवेशाकरिता पूर्णपणे निषिद्ध असून विशिष्ट कारण, परवानगीशिवाय तिथे प्रवेशबंदी आहे. अशा प्रसंगी कुणी त्या परिसरात प्रवेश केल्यास वनविभागास त्या परिसरात ‘अतिक्रमण’ केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करता येईल.”