हल्दीराम कंपनीची मुदतबाह्य सोनपापडी विकणाऱ्या मॉलवर कारवाई

ठाणे – पोलीसनामा ऑनलाईन – भिवंडी येथील काल्हेर परिसरात एका फूड मॉल मध्ये हल्दीराम कंपनीची मुदतबाह्य सोनपापडी विक्री होत होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी हजारो रुपये किंमतीची सोनपापडी जप्त करण्यात आली. दरम्यान, ही धडक कारवाई स्थानिक मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली आहे.

मनसे कार्यकर्त्यांची मॉलवर धाड

याबाबत मिळालेली आधीक माहिती अशी की, भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील प्रसिद्ध ‘श्री बालाजी फूड मॉल’ मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या वस्तू मुदतबाह्य असल्याची खबर मनसे कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी मॉलवर धाड टाकली व येथील खाद्य वस्तूंची तपासणी केली. त्यामध्ये हल्दीराम कंपनीची सोनपापडी मुदत संपलेली असतानाही तिची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना तत्काळ घटनास्थळी पाचारण केले.

अन्न व औषध प्रशासन निरीक्षक अरविंद खडके यांनी पथकासह मॉलमध्ये उपस्थित राहून घटनास्थळाचा पंचनामा करून हजारो रुपयांची सोनपापडी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या या खाद्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. न्यायिक वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच दुकान मालक प्रभू गामी याच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे संकेत अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.