‘या’ प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्याला भाजप देणार लोकसभेची ऑफर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड मधील मंडळी राजकारणात येण्याचा ट्रेंड काही नवा नाही नुकतेच अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार अशा चर्चा होती. मात्र आता धर्मेंद्र पुत्र सनी देओल यांची देखील राजकारणात एंट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेता सनी देओलला लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी भाजप उत्सुक असल्याची माहिती आहे.

Image result for sunny deol

मूळ पंजाबी असलेल्या सनीला पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून तिकीट देण्याची भाजपाची तयारी आहे. पण सनी देओल निवडणूक लढण्यासाठी फारसे उत्सुक नाही. त्यामुळे सनीला उमेदवारीसाठी तयार करण्यासाठी पंजाबमधील भाजप नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी सोपवली आहे. सनी देओलचे पिता आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भाजप नेते गळ घालणार आहेत.

गुरुदासपूर भाजपचा बालेकिल्ला

गुरुदासपूर हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपरिक मतदारसंघ होता. १९९७, १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये ते या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. २०१७ मध्ये विनोद खन्नांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुनील जाखड हे तब्बल १,९३,२१९ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून ही सीट खेचून आणण्याचा भाजपचा मानस असेल.

तर चित्रपट विश्वातील मायलेक संसदेत एकत्र झळकतील

दरम्यान, सनी देओल यांची सावत्र आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनीही मथुरेतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विजेतेपदाची माळ दोघांच्याही गळ्यात पडली, तर चित्रपट विश्वातील मायलेक संसदेतही एकत्र झळकण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरेल.