तामिळ अभिनेत्री खुशबू सुंदर अपघातातून थोडक्यात बचावल्या, घातपाताचा संशय

तामिळनाडू : वृत्तसंस्था – अलीकडेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर (actress And Bjp Leader Khushbu Sundar) यांच्या कारला एका भरधाव कंटेनरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात त्या बालंबाल बचावल्या असून, वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी (दि. 18) सकाळी तामिनाडूतील मेलामरवाथूरजवळ हा अपघात झाला. घडलेल्या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वत: खुशबू यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे.

खुशबू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमची गाडी योग्य लेनमधून जात होती. पण अचानक गाडीला एका कंटेनरने धडक दिली. हा अपघात मेलामरवाथूरजवळ घडला आहे. खुशबू सुंदर या वेल यात्री कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कडलोर येथे जात होत्या. त्यासोबतच खुशबू यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले. तसेच मुरुगन देवाच्या कृपेने त्या या अपघातातून बचावल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच कितीही संकटे आली तरी त्या कडलोर दौऱ्याला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. खुशबू सुंदर म्हणाल्या की, आम्ही कंटेनरला नाही तर कंटेनरने आमच्या गाडीला धडक दिली आहे. आमची गाडी योग्य दिशेने पुढे जात होती. तेव्हा कंटेनरच अचानक कुठून आला माहीत नाही आणि त्याने आमच्या गाडीला धडक दिली. पोलीस चालकाची चौकशी करत आहेत.