‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही’, ‘या’ मंत्र्याचं वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण किंवा त्या प्रकरणाच्या चौकशीशी आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयेदेखील संबंध नाही. कुणाकडे तसे पुरावे असतील तर त्यांनी बेधडक मीडिया समोर आणावेत आणि आरोप सिद्ध करून दाखवावेत असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. पत्रकारांसोबत बोलताना अनिल परब म्हणाले, “मुळात सुशांत सिंह प्रकरणात सीबीआय चौकशीची होणारी मागणी हे निव्वळ राजकारण आहे. प्रत्येकजण यावर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय. एखादा मागणी करतोय म्हणून लगेचच कोणता तपास सीबीआयकडे देता येत नाही. त्यासाठी ठोस कारणंही असावी लागतात जी संबंधितांना द्यावी लागतात. मुंबई पोलिसांनी आधीच या सगळ्याचा खुलासा केला आहे. गेल्या 5 वर्षात अनेक आत्महत्या आणि कांड झाले आहेत. यातील किती प्रकरणांचा तपास सीबीआयकडे दिला आहे. याचाही तपास सीबीआयकडे का द्यावा” असा सवाल त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंवरील आरोप खोडून काढत परब म्हणाले, “राजकारणात प्रतिमा खराब करण्यासाठी आरोप करण्याचं तंत्र जुनं आहे. आताही मुख्यमंत्र्यांची आणि शिवसेनेच्या युवा नेत्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी तेच षडयंत्र वापरलं जातंय. मोदींवर गोध्रा हत्याकांडाचा ठपका आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. सोहराबुद्दीन प्रकरणात वारंवार अमित शाह यांचं नाव घेतलं जातं. कालांतरानं आरोप सिद्ध झाले नाहीत हेही त्यांनी निदर्शनास आणलं. आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही असंच कारस्थान सुरू आहे. त्यांची राजकीय कारकीर्द खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचा विरोधी पक्ष हे सगळं करतोय. काही लोक व्हॉट्सअॅपवर मेसेज फिरवत आहे ते कोणाशी संबंधित आहेत हे तपासायला हवं” असा आरोप परब यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री अडथळे आणत आहे. त्यांच्या दबावामुळं मुंबई पोलीस या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करू शकत नाहीत असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार आणि राज्याचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केला होता. त्यांनी अशीही मागणी केली होती की, सीबीआयनं तातडीनं हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील मुव्ही माफियांचा पर्दाफाश करावा. याशिवाय बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं देखील अलीकडेच काही ट्विट केले होते. यात ती म्हणाली होती, “करण जोहर हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा मित्र असल्यानं त्याला अजून चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही.” असा आरोप कंगनानं केला होता. याशिवाय तिनं आणखी एका ट्विटमध्ये मुंबई पोलिसांवरही टीका केली होती. सुशांतचा हत्येची ही थट्टा थांबवा असं ती म्हणाली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like