खड्यांमुळे आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील सर्वच महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्याचा फटका शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर घोटीजवळ फुटला. त्यामुळे दुसऱ्या गाडीने त्यांना हॉटेलला पोहोचावे लागले. आपण सुखरुप असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

खड्ड्यांचा त्रास तुम्हा-आम्हाला नवीन नाही. पण जेव्हा आदित्य ठाकरेंसारख्या महत्वाच्या नेत्याच्या गाडीचा टायर मध्यरात्री फुटतो, तेव्हा मात्र सोबतच्या सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. शेवटी दुसऱ्या गाडीने आदित्य ठाकरे मुक्कामासाठी हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर टायर फुटलेली गाडी टोईंग करुन नाशिकमध्ये आणली गेली आणि दोन्ही टायर बदलण्यात आले.

[amazon_link asins=’B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7b0152f-a819-11e8-9127-bde32cbd565b’]

रेंज रोव्हर सारखी आलिशान गाडी जिचे टायर हे मोठे असतात. अशा गाडीचे टायर जर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे फुटत असेल तर सामान्य गाड्यांचे या पावसाळ्यात काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटण्याची घटना ज्या घोटी परिसरात घडली, त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यांची खूपच दुर्दशा झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या भागात झाली आहे. खड्डे हुकवण्याच्या नादात या भागात एका दुचाकीस्वाराला आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

राज्यात युतीचे सरकार आहे आणि सार्वजनिक बांधकाम खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. पाऊस सुरु झाला की महामार्गावर पडणारे खड्डे हा नेहमीचाच विषय झाला असून गेल्या वर्षी त्यावर जवळपास सहा महिने चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. आताही पावसाळा सुरु झाल्यापासून महामार्गावर खड्ड्यांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे. आता हा विषय चष्टेचा झाला असून अनेक वाहिन्यांनी तर तो एक इव्हेंट म्हणून अभिनेते, अभिनेत्री यांना घेऊन रस्त्यावर कोठे कोठे खड्डे पडले आहेत, याची मिटक्या मारत चर्चा करु लागले आहेत. पण, त्याचे काहीही गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला दिसून येते. खुद्द आता सरकारमधील शिवसेनेच्या नेत्यांनाच त्याचा फटका बसल्यावर आता तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असे अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

डिसेंबर अखेर राज्य खड्डे मुक्त करू;  चंद्रकांत पाटील यांची नवी डेडलाईन

आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे फुटल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी महामार्गावरील डिसेंबर अखेर राज्य खड्डेमुक्त करु अशी डेडलाईन त्यांनी टष्ट्वीटरवरुन जाहीर केली आहे व खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत.