गणेशोत्सवाबाबत प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घ्यावी : मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याचे कोरोना साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे. प्रशासनानेही उत्सवाबाबत सहकार्याची आणि सामंजस्याची भूमिका घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले आहे.

सद्यस्थितीतील कोरोना साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुण्यामध्ये सर्वधर्मियांनी सण, उत्सव साधेपणाने साजरे केले आहेत. पुण्याचा मानबिंदू असलेला गणेशोत्सवही साधेपणानेच करण्याचा निर्णय गणपती मंडळांनी घेतलेला आहे. शासनाच्या नियमांच्या आधीन राहून श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार नाहीत. भव्य सजावट आणि देखावेही करण्यात येणार नाहीत. मोठे मांडव, रनिंग मांडव, बॉक्स कमानी, जाहिरात फलक हे सर्वही टाळण्यात येणार आहे. धार्मिक नित्योपचार वगळता कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत याचीही दक्षता मंडळांनी घेतली आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्व त्या दक्षता मंडळे घेत आहेत आणि घेणार आहेत. उत्सव काळात आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. मंडळांच्या सहकार्याने फर्ग्युसन कॉलेज येथे केअर सेंटर चालविण्यात येणार आहे. लॉकडाऊन च्या काळात गरजुंना अन्नदान, औषधोपचार अशी मदत अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. मंडळांची ही विधायक भूमिका पहाता प्रशासनानेही मंडळांबरोबर सामंजस्याची भूमिका घेऊन सहकार्य करावे असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचा उपाय म्हणून शासनाच्या निर्णयानुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिरात उत्सव साजरा करावा असे म्हणणे सध्यातरी संभ्रमात टाकणारे आहे. या बाबीचा विचार करावा आणि मंडळांना स्वेच्छेने भूमिका घेण्याची मोकळीक द्यावी असे मोहन जोशी यांनी सुचविले आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवाला सव्वाशे वर्षांहून आधिक मोठी परंपरा आहे. दहा वर्षांपूर्वी आलेली स्वाईन फ्ल्यू ची साथ असो अथवा १८९७ साली आलेली प्लेगची साथ असो. तेव्हा सामाजिक भान ठेऊन साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. तीच परंपरा यंदाही कायम ठेवली जाणार आहे असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.