काम पूर्ण केल्यावर लाच घेणाऱ्या दुय्यम निबंधक, दस्तलेखकाला अटक

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – काम होण्याअगोदर लाच मागितली तर तो तक्रार करेल व आपल्यावर कारवाई होईल, अशी भिती अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे काम केल्यानंतर त्यांनी लाच मागितली व ती घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले.

दुय्यम निबंधक माधवी बाळासाहेब पानसे (वय ५०, दुय्यम निबंधक कार्यालय, बिलोली, जि. नांदेड, रा. आशिर्वादनगर, नांदेड) आणि दस्तलेखक हणमंत मारोतीराव शिवपणोर (पाटील) (वय ५०, रा. बिलोली, जि. नांदेड) अशी त्यांची नावे आहे.

याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या व्यवसायिकाने तक्रार केली होती. या तक्रारदाराने शेत जमीन खरेदी केली होती. या खरेदी केलेल्या शेत जमिनीचा दस्त नोंदणी करण्यासाठी शेत जमीन विक्री करणाऱ्याकडे पॅन कार्ड नव्हते. पॅन कार्ड नसतानाही अडजेस्ट करुन या दोघांनी त्यांची नोंदणी करुन दिली. हे काम केल्याबद्दल हणमंत शिवपणोर यांनी ८ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी करताना त्यांनी तडजोड करुन साडेसात हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानंतर बिलोली येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून साडेसात हजार रुपये घेताना हणमंत पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना लाच घेण्यास प्रोत्साहित करुन साह्य केल्याच्या कारणावरुन माधवी पानसे यांनाही अटक करण्यात आली आहे.

जाहिरात