मनोहर जोशींनंतर केंद्रीय मंत्री गडकरींनी घेतली CM ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी भाजप विविध मुद्यांवरून एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवत आहेत. असे असताना भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुुरुवारी (दि. 7) सकाळी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरी संध्याकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. या भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त आमदार, औरंगाबादचे नामांतर अशा अनेक विजयांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांनी एकाच दिवशी माजी मुख्यमंत्री जोशी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत्ल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. यावेळी गडकरी यांनी मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. मनोहर जोशी हे 1995 ते 1999 राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज्यात सेना आणि भाजप युतीचे सरकार होते. युती सरकारमध्ये गडकरी यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विकासामध्ये गडकरी यांचा महत्वाचा वाटा होता.