मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनालइन –   काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली केल्यानंतर आता नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूरयेथील अतिरिक्त विभागीय आयुक्त IAS अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना महामारी दरम्यान मिसाळ यांची अचानक बदली करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची जुलै 2019 रोजी तात्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेले दुरावा दूर करून संवाद वाढवला होता. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महापालिकेचा कारभार स्विकारल्यानंतर काही महिन्यातच कोरोनाने शहरात शिरकाव केला.

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मिसाळ यांनी योग्य उपाययोजना केल्या होत्या. शहरातील नागरिकांना कोरोना बाधितांचा त्रास होऊ नये यासाठी पनवेल येथील इंडिया बुल्स सोसायटी क्वारंटाईन सेंटर तयार केले. परंतु राजकीय लोकांना त्यांचा हा प्रयत्न पचनी पडला नाही. राजकीय लोकांना विश्वासात न घेता त्यांनी शहराबाहेर क्वारंटाईन सेंटर हलवल्याने त्यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर केंद्रातील कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. मात्र वाशीत सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भव्य क्वारंटाईन सेंटर तयार करून मिसाळ यांनी सडेतोड उत्तर दिले.

अशा परिस्थितीत अचानक राज्य सरकारने मिसाळ यांची बदली केल्यामुळे शहरात सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आहे. मिसाळ यांच्या जागेवर नवे आयुक्त म्हणून नागपूर येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त आयएएस अधिकारी अभिजित बांगर यांची नियुक्ती केली असून आता ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम सांभाळणार आहेत.