पुण्यानंतर कोल्हापूरात आढळले 5 गवे

कोल्हापूर : पुणे शहरात गेल्या आठवड्यात 2 गवे आले होते. त्यातील एकाचा लोकांच्या आरडाओरडामुळे जखमी होऊन मृत्यु झाला होता. आता पुण्यापाठोपाठ कोल्हापूरात ५ गव्यांचा कळप आढळून आला आहे. त्यामुळे शहरात एकच चर्चा आहे. कोल्हापूर गगनबावडा रोडवरील लक्षतीर्थ परिसरात जिव्हाळा कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे गवे आढळून आले. कोल्हापूरातील राधानगरी अभयारण्य हे रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या भागात नेहमीच रानगव्यांचे दर्शन घडते. पण कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीपासून काही अंतरावर हे रानगवे प्रथमच दिसून आले. एकूण ५ गव्यांचा हा कळप होता़ तो नंतर उसाच्या शेतात निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

ही माहिती समजताच पोलीस, वन विभाग, अग्निशामन दलाकडून त्यांचा शोध सुरु झाला. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ शिंगणापूरकडे जाणारा रस्ता बॅरिकेडस लावून वाहतूकीसाठी बंद केला. रात्रीचा अंधार, उसाची शेती यामुळे गव्यांचा माग लागला नाही. रात्री उशिरापर्यंत गव्याचा शोध सुरु होता.