दारुच्या नशेत मित्राचा खून करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर

विटा : पोलीसनामा ऑनलाईन – दारुच्या बाटल्या खाली टाकल्याच्या कारणावरुन डोक्यात व पाटीवर दगडाने मारून तरुणाचा खून केल्याची घटना आज (शुक्रवार) उघडकीस आली आहे. अमित प्रदीप भिंगारदेवे (वय 22 रा.नेहरुनगर विटा) असे मृताचे नाव आहे. तर संशयीत आरोपी लक्ष्मण आण्णा चौगुले (वय 20 रा.बजरंगनगर विटा) याने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत खूनाची कबूली दिली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी प्रदीप संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विटा येथील अमित भिंगारदेवे आणि लक्ष्मण चौगुले हे दोघे मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वादावादी होत होती. गुरुवारी सकाळी लक्ष्मण चौगुले हा विनोद कॅफे हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या दारुच्या दुकानात गेला होता. त्यावेळी दारु पिताना त्याच्या हातातील ग्लास खाली पडला. यावेळी तिथे असलेल्या अमित भिंगारदेवे याने लक्ष्मणला मारहाण केली होती. तसेच त्याला बाहेर बुरुजाजवळ नेवून परत मारहाण केली. त्यावेळी लक्ष्मण चौगुले याने अमितला आपला वाद गेल्या काही दिवसांपासून वाढत चालला आहे.

हा वाद आपण एकत्र बसवून मिटवूया असे सांगितले. काही वेळाने त्याने रविंद्र चव्हाण या मित्राची दुचाकी घेवून अमितला घुमटमाळ येथील घाडगेवाडी रस्त्यावर ओढ्याशेजारी असलेल्या निर्जन अशा झाडीत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेले. त्या ठिकाणी नेल्यावर अमितने आपल्याला विनाकारण केलेल्या मारहाणीचा राग लक्ष्मण चौगुलेच्या डोक्यात होता.तिथे गेल्यावर अमितला काही कळायच्या आत लक्ष्मणने त्याच्या डोक्यात आणि पाठीत दगडाने प्रहार केला. अचानक झालेल्या हल्लयामुळे अमित जागीच कोसळला. त्यावेळी लक्ष्मणने त्याच्या पाठीत लागोपाठ तीन चार वेळा दगड उचलून टाकला. त्यात त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर मार बसला. त्यानंतर भेदरलेल्या लक्ष्मणने तो जीवंत नसल्याची खात्री करत जवळच असलेल्या ओढ्यात अमितचा मृतदेह टाकून दिला आणि घटनास्थळावरुन पसार झाला.

खून केल्यानंतर लक्ष्मण हा अस्वस्थ होता. त्याला खून केल्याचा पश्‍चाताप झाला होता. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण चागैुले हा स्वतः पोलिस ठाण्यात जावून आपण अमित भिंगारदेवे याचा दारुच्या नशेत खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला घेवून घुमटमाळ येथील ओढा परिसरात गेले. त्यावेळी एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुरुवारी दोनदा आपल्याला मारहाण केल्याने आपण दारुच्या नशेत त्याचा खून केल्याची कबूली दिली.
अमित हा चालक म्हणून खासगी गाडीवर कामाला जात होता. रात्री उशिर झाला तरी घरी आला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला परंतू तो स्वीच ऑफ होता. आज दुपारी पोलिसांनी अमितच्या वडिलांना फोन करुन घुमटमाळ परिसरात या असे सांगितले. त्यावेळी तिथे बरीच गर्दी जमलेली त्यांना दिसली. गर्दीत पुढे जावून पाहिले असता अमितचा मृतदेह त्यांना दिसला. अमितच्या पश्‍चात आई,वडील,दोन भाऊ,बहीण असा परिवार आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर,सहाय्यक निरीक्षक धनाजी पिसाळ,नानासाहेब मोहिते,नितीन माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली.