Independence Day : मुलींच्या लग्नाचे वय बदलण्याचे PM मोदींनी दिले लाल किल्ल्यावरून ‘संकेत’

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य’ मिशनची घोषणा केली. कोरोना विषाणूवरील औषध कधी येणार?, देशातील नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार? आदी बाबींवर नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी नारीशक्तीला सलाम करत मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत सरकार विचार करत आहे. यासाठी समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेणार आहे, असेही त्यांनी जाहीर केलंय.

यावेळी मोदी म्हणाले की, देशात सुमारी 40 कोटी जनधन खाती सुरु झालीत, त्यापैकी 22 कोटी खाती ही महिलांची आहेत. कोरोना काळात महिलांच्या खात्यांवर एप्रिल, मे, जूनमध्ये सुमारे 30 हजार कोटी रुपये जमा केलेत. आज महिला कोळसा खाणींसह लढाऊ विमानांद्वारे यश मिळवत आहेत. भारतीय महिलांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्याचे सोने केलंय. तिहेरी तलाकमुळे महिला त्रस्त होत्या, त्यांना स्वातंत्र्य दिलंय. गरीब मुलींच्या आरोग्याची चिंता सरकारला आहे.

लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केलीय. या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. त्याद्वारे त्याच्यावर डॉक्टरांनी काय उपचार केले?, कोणती औषधे दिली?, त्याला असलेले आजार, डॉक्टरांनी केलेले निदान आदी माहिती ठेवणार आहे. तसेच मध्यमवर्गीयांसाठी ही योजना फायद्याची असणार आहे.

कोरोना विषाणूची लस कधी येणार? हा सर्वांना प्रश्न पडला आहे. सध्या तीन लस विविध टप्प्यात असून प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन तयार आहे. शेतकरी बंधनमुक्त झालाय. देशात कुठेही शेतमाल विकू शकतो. कामगारांसाठी शहरांमध्ये राहण्याची योजना राबविणार आहे.

पायाभूत सुविधांसाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाणार आहे. विविध क्षेत्रात 7 हजार प्रकल्पांची निवड केलीय. चार लेनचे हायवे बनविण्यासाठी काम करणार आहे. परदेशी गुंतवणुकीने गेल्या वर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. एफडीआयमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झालीय, असा आढावा देखील मोदी यांनी सांगितला.