‘डॉक्टर माझी बायको रोज 3 वेळा…’, हॉस्पीटलला कॉल करून पतीनं केली पत्नीविरूध्द तक्रार

अहमदाबाद : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशातील विविध राज्यात त्या त्या प्रशासनानुसार लॉकडाऊन आणि अनलॉक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, 24 मार्च पासून लॉकडाऊन आणि अनलॉक हे वेळोवेळी लावले जात असल्यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबीयांसमवेत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाद, तंटे आदी होत असल्याचेही पहायला मिळत आहेत. यातच एकाने आपल्या पत्नीविरूध्द डॉक्टरांकडे तक्रार केली आहे. डॉक्टरदेखील त्या पतीची/तक्रारदाराची तक्रार ऐकून थक्क झाले. हा प्रकार घडला आहे गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे

एकीकडे कोरोना विषाणूचे संकट तर दुसरीकडे लॉकडाऊन, यामुळे तब्बल 4 महिने लोकं घरात कैद आहेत. यामुळे कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ लोकं घालवत आहेत, मात्र यामुळे घरात भांडणेही होत आहेत. पतीने सरकारी मेडिसिन हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपल्या पत्नीची तक्रार केली. तो व्यक्ती/पती म्हणाला की, माझी पत्नी दररोज 500 लिटर पाण्याची टाकी रिकामी करत आहे. एवढेच नव्हे तर, ती तीन वेळा संपूर्ण घर धुवून काढते.

अर्थात कोरोना विषाणू संक्रमणाच्या भीतीमुळे त्यांची पत्नी घरातले सर्व पाणी वापरत आहे. याबद्दल शेजार्‍यांनीही तक्रार केली आहे. त्यामुळे हैराण होऊन पतीने हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला आणि आपल्या पत्नीची तक्रार समोरील डॉक्टरांना सांगितली. यावेळी हेल्पलाईनवर असलेले मानसोपचारतज्ज्ञ रमाशंकर यादव म्हणाले की, फोनवर बोलताना ती व्यकती(पती) संतापलेली होती. त्याची पत्नी कोणालाही घरात येऊ देत नव्हती. त्यालाही वेगवेगळे नियम पाळण्यास भाग पाडत होती. पत्नी सांगेल त्याप्रमाणे त्याला आंघोळ करावी लागत होती. या सगळ्यामुळे वैतागलेल्या पतीपुढे पत्नीची तक्रार करण्याशिवाय पर्याय नव्हता.

आणखी मेडिसिन हेल्पलाइनवर मजेशीर तक्रारी…
राज्य सरकारने मे महिन्यामध्ये 1100 मेडिसिन हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत 12 हजाराहून अधिक लोकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधून मनोचिकित्सकांचा सल्ला घेतला आहे. हेल्पलाइनचे समन्वयक डॉ. अजय चौहान याबाबत म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळाच्या तुलनेत आता अशा फोन कॉलची संख्या 50 टक्के आहे. लॉकडाउन चालू होते तोपर्यंत, बहुतेक तक्रारी चिंता आणि कोरोना विषाणूच्या माहितीसाठी येत आहेत.

… आणि दोन लीटर सॅनिटायझरचा करते वापर
एका तक्रारीबाबत डॉक्टर म्हणाले, त्यांना काही दिवसांपूर्वी एक महिला दररोज 2 लिटर सॅनिटायझर हातावर लावत आहे. त्यामुुळे तिची कातडी फाटल्याची तक्रार आली होती. मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मृगेश वैष्णव म्हणाले की, आजार, मृत्यू यांच्याबाबतची भीती हेच मुख्य कारण आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी वारंवार हात धुण्यास सांगितले जाते. मात्र, बरेच लोकं प्रमाणाबाहेर याचा वापर करतात. अशा परिस्थितीत सुरक्षा उपायांच्या संतुलित वापरासाठी लोकांना समुपदेशन देखील गरजेचे आहे.

लॉकडाऊन, अनलॉकमुळे लोकं हैराण
सध्या लॉकडाऊन आणि अनलॉकमुळे अनेक लोकं हैराण झाली आहेत. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून अनेकांचे हातातील काम गेले आहे. कोरना ह्या विषाणूचा फैलाव अधिक होत आहे. मात्र, अनेकांचे आर्थिक गणिते कोलमडत आहेत, त्याचं काय? असा प्रश्न अनेक कुटुंबप्रमुखांचा पडत आहे. त्यामुळे कोरोना असला तरी काम करून आर्थिक तजवीज करण्यावर अधिक भर आहे. यातच अनेक राज्यातील वैद्यकीय सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे एखाद्याला कोराना झाला तरी त्याच्यावर योग्यवेळी उत्तमप्रकारे उपचार होतील याची खात्री मिळेना अशी स्थिती आहे.

सोशल मीडियातून आढळताहेत नैराश्याच्या पाऊलखूणा
सरकार आणि प्रशासनाने या अगोदरच वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर म्हणावे तेवढे लक्ष दिले नसल्यामुळे भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारली असली तर, काही सरकारने कागदोपत्री खेळ आणि फोटो सेशनसाठी उभारली आहेत का? असा प्रश्नदेखील सोशल मीडियातून विचारला जात आहे. अनेक लोक लॉकडाऊन आणि अनलॉकमुळे घरात असल्यामुळे त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहचण्याची माध्यमे देखील कमजोर आहेत. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातून नैराश्य, भांडण, तंटे आदी बाबी घडत आहेत, याचीच पाऊलखूणा हेल्पलाईन आणि पोलीस ठाण्यातील काही केसेसमधून आढळून येत आहेत.