अहमदनगर : राष्ट्रवादीची उमेदवार शोध मोहीम ; कुलगुरूंच्या नावाची चाचपणी  

अहमदनगर  : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने गाजलेला मतदारसंघ अशी ओळख बनून गेलेल्या अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोध घेण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागली आहे. प्रशांत गडाख यांनी लढण्यास नकार दिल्यानंतर अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वा भोवती असणारे गुन्हेगारीचे वलय पाहता त्याच्या नावाची देखील चर्चा मागे पडली. तर आता कुलगुरू राहिलेल्या माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या नावाची चाचपणी राष्ट्रवादीने सुरु केली आहे.

अरुण जगताप यांचे सामाजिक संघटन आणि त्यांचे नातेसंबंध पाहता त्यांना उमेदवारी देणे राष्ट्रवादीला कधी हि आवडले असते . मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती असणारे गुन्हेगारीचे वलय पाहता त्यांना उमेदवारी देण्याचा धाडस राष्ट्रवादी करणार नाही . कारण त्यांना उमेदवारी दिली, तर गुन्हेगारी देखील स्थानिक प्रचाराचा मुद्दा बनू शकतो . तसेच तरुण चेहरा म्हणून संग्राम जगताप यांच्या नावाची देखील चर्चा राष्ट्रवादीने करून पहिली मात्र संग्राम जगताप स्वतः  व्यक्तिगत निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत असे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. अशा सर्व पर्यायाची चाचपणी केल्यानंतर राष्ट्रवादी पुढे उमेदवाराचा पर्यायच उरत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार शोधाचा मोठा पेचप्रसंग पडला आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार भाजप उच्च शिक्षित उमेदवार म्हणून करणार म्हणून राष्ट्रवादीने कुलगुरू राहिलेल्या डॉ. सर्जेराव निमसे यांना उमेदवारी करण्यासाठी गळ घातली आहे . त्यामुळे आगामी काळात त्यांचेच नाव राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निश्चित केले जाण्याची शक्यता आहे . नांदेड आणि लखनऊ या ठिकाणी कुलगुरु म्हणून काम पाहीलेल्या निमसे यांनी नगरमध्ये दीर्घ काळ प्राचार्य म्हणून काम पहिले आहे . त्यामुळे शिक्षण क्षेत्रात निमसे यांचा चांगला संपर्क आहे . म्हणूनच राष्ट्रवादी त्यांना उमेदवारी देऊ पाहत आहे.