राहुरीत अपहरण केलेल्या पत्रकाराची निर्घृण हत्या झाल्याचे उघड, अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

राहुरी : पोलीसनामा ऑनलाइन – राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे मंगळवारी दुपारी अपहरण झाले होते. त्यांचा खुन झाल्याचे आज उघड झाले. राहुरी कॉलेजजवळ आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

रोहिदास दातीर असे त्यांचे नाव आहे. रोहिदास दातीर हे एका साप्ताहिकाचे संपादक, मालक होते. त्याचबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते. राहुरी येथील मल्हारवाडी रस्त्यावर मंगळवारी दुपारी अपहरणाचा हा प्रकार घडला होता. या रस्त्यावर रोहिदास दातीर व स्कॉपिओमधून आलेल्या काही लोकांची चर्चा झाली. त्यावेळी गाडीतील लोकांनी दातीर यांना मारहाण करुन जबरदस्तीने गाडीत बसविले. यावेळी दातीर आरडओरड करीत होते. तरीही अपहरणकर्ते दातीर यांना घेऊन पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन अपहरणकर्त्यांचा माग करण्याचे काम सुरु होते. त्याचदरम्यान आज सकाळी राहुरी कॉलेजजवळ दातीर यांचा मृतदेह आढळून आला.