बीडकरांनो अजून किती दिवस ‘बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो’ ?

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – शहराच्या विकासाच्या आणाभाका घेणाऱ्या क्षीरसागरांनी गेल्या ३० वर्षात शहराची फक्त दुर्दशाच केली आहे. विकासाचा डांगाेरा पिटणारे क्षीरसागर शहरातील भुरभुरीनंतर तयार झालेल्या चिखलाचे श्रेय घेणार का ? ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, दुचाकी चालकांचा चिखलात गाडी स्लिप होऊन अपघात झाला याची जबाबदारी स्वीकारणारत का ? कि बीडकरांनी देखील गांधीजींचा आदर्श घेत बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो हा आदर्श तर घेतला नाही ना ? ज्या मायबहिणी अन भाऊ आज दिवसभरात विविध ठिकाणी चिखलात दुचाकी स्लिप होऊन जखमी झाले त्यांच्या नाहक त्रासाला जिम्मेदार असणाऱ्या क्षीरसागरांना जाब विचारणार आहेत का ? असा सवाल करत शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष अजय सुरवसे यांनी पावसाच्या नुसत्या भुरभुरीत क्षीरसागरांच्या विकासाचे पितळ उघडे पडल्याचा आरोप केला आहे.

बीड शहरात गेल्या २ दिवसांपासून भुरभुर पाऊस चालू आहे. ऐन पावसाळ्यात भुयारी गटार योजनेचा मुहूर्त साधत नगरपरिषदेने शहरवासीयांना जखमी करण्याचा पॅटर्न राबविल्याने दिसून येत आहे. अख्खा उन्हाळा काहीच काम न करता पावसाळ्यात भुयारी गटाराचे काम सुरु करून शहरात चिखलाचे साम्राज्य निर्माण करण्याचे काम क्षीरसागरांकडून तसेच त्यांच्या मर्जीतील कंत्राटदाराने केले आहे. या चिखलाने काल दिवसभरात १०० पेक्षा अधिक नागरिकांना जखमी केले. या नाहक त्रासाबद्दल नप व कंत्राटदाराला जबाबदार धरत गुन्हा का दाखल करू नये ? बीड शहरात आजपर्यंत गांधीजींच्या आदर्शावर चालल्यागत कारभार चालू आहे.

नगरपरिषदेच्या एकहाती हुकूमशाहीविरोधात  ‘बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो’  अशीच काहीशी पद्धत सुरू आहे. मात्र शहरवाशियांनो आता तुम्हाला होणाऱ्या त्रासाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे. अजून किती दिवस तुम्ही तुम्हालाच त्रासदायक ठरणाऱ्या क्षीरसागरांच्या अडेलतट्टू भूमिकेला साथ देणार आहेत? या सवालासह पावसाच्या भुरभुरीत क्षीरसागरांच्या विकासाचे पितळ उघडे पडल्याचा आरोप शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष अजय सुरवसे यांनी केला आहे.
आरोग्यविषयक वृत्त