विधानसभा निवडणूक ‘बॅलेट’ पेपरवर घ्या : अजित पवार

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएम मशीन कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे. विरोधकांकडून नेहमीच EVM वर शंका व्यक्त करण्यात येते. EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यात यावी अशी देखील मागणी पुढी केली जाते. त्याच मागणीची पुनरावृत्ती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. पवार म्हणाले की, प्रगत देशात निवडणूका बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. त्या ठिकाणी सुद्धा EVM चा वापर केला जात नाही.

पिंपरी-चिंचवडमधील सांगवीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. आपले मत ज्याला दिले आहे. त्यालाच झाले आहे का ? याची मतदाराला माहिती कळणे आवश्यक आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास लोकांचा मतदानावरील विश्वास अजून दृढ होईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले, लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनाधार मिळविणे. जनतेला विश्वास देण्याचे आमचे ठरलं आहे. विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत. जागा वाटपासंदर्भात काँग्रेस सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सर्व मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत होते. परंतू, आता चौकशाची भीती दाखवून, प्रलोभने दाखवून विरोधी पक्षातील आमदारांना फोडले जात आहे. काहीजण आपले काही खरे नाही, ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून पक्षांतर करतात. निष्ठेला महत्व दिले जात नाही.