‘राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये, तातडीने निर्णय घ्यावा’ – अजित पवार

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनः – विधानपरिषदेतील 12 जागांचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप घेतलेला नाही. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये. तातडीने निर्णय घ्यावा. महाविकास आघाडीने सगळ्या नियम-अटी पाळण्याचे काम केलेले आहे. मुख्यमंत्र्याच्या पत्रांतून 12 जणांची विधानपरिषदेसाठी नावे दिली आहेत. सभागृहात 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेले आहे. एवढे सगळे झाले असताना आज ज्यांच्या हातात शेवटची सही करायची आहे, ते सही करत नाहीत. त्यासाठी आम्हाला त्यांना भेटावे लागेल. किती काळ अजून थांबायचे? अधिकार असला तरी त्याला काहीतरी काळ-वेळ असली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौ-यावर होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला मार्ग काढावे लागतात हे समजू शकतो. पण, रस्त्यावर खिळे ठोकणे योग्य नाही. गेल्या 72 दिवसांपेक्षा अधिक काळ शेतकरी एवढ्या थंडी- वा-यात आंदोलनाला बसले आहेत. आतापर्यंत सरकारने चर्चा करुन मार्ग काढायला हवा होता. लोकशाहीमध्ये चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो, असे पवार म्हणाले.

दरम्यान, पेट्रोल दरवाढीबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने पेट्रोलवरील टॅक्स कमी करण्याची मागणी केली आहे. याबाबत पवार यांनी’ आधी केद्र सरकारला टॅक्स कमी करायाला सांगा मग आम्ही विचार करु, अशा शब्दांत सुनावले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यावर त्यांनी या प्रकरणात पोलिस योग्य ती कारवाई करतील. कोणीही हस्तक्षेप करणार नाही. मुंडे यांच्या मुलांचे जाब पोलिसांनी घेतले असून पोलीस पुढील कारवाई करतील असे म्हणाले.