आम्ही शिवसेनेसोबत कधी जाणार नाही- अजित पवार 

रायगड : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पडदा टाकला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे विचार वेगवेगळे आहेत. यामुळे राष्ट्रवादी त्यांच्यासोबत कधीच जाणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंना पुस्तक देण्यासाठी गेले होते, अस त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या माध्यमातून राज्य पिंजून काढणार आहे. भाजप सरकारने भ्रमनिरास केला आहे. बेरोजगारी, महागाईसह अनेक समस्यांनी राज्य त्रासले आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन करण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील जागा वाटपाच्या चर्चेवरूनही अजित पवार यांनी आपलं मत मांडलं. राज्यात 40 जागांवर जागा वाटप झालं आहे. त्याचबरोबर आठ जागांवर चर्चा सुरु आहे. या जागेंचा तिढा पक्षातील वरिष्ठ नेते सोडवतील. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात या जागांसंदर्भात चर्चा झाली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच सर्व सेक्युलर मतं एकत्र ठेवून भाजपचा पराभव करू, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

राज्यात 25 फेब्रुवारीपर्यंत निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा काढली जाणार आहे. यात्रेदरम्यान राज्यात किमान 75 सभा घेतल्या जातील. रोज तीन सभा घेऊन दुष्काळ, ग्रामीण शहरी समस्या, आरक्षण, हमीभाव, फसवी आश्वासने, कर्जमाफी या गंभीर समस्यांवर आवाज उठवणार असल्याचा ईशारा अजित पवारांनी दिला आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांसाठी काही कालावधी असतानाच मोदी सरकारने सवर्णांच्या आरक्षणाची घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत. सवर्णांच्या आरक्षणाचा चुनावी जुमला असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार समाजात तेढ निर्माण करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.